Subscribe Us

header ads

Tukdoji Maharaj or Manikdev Banduji Ingale: Spiritual Saint in Maharashtra, India

राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज: ग्रामगीतेचे रचयिता 

30 एप्रिल : जयंती 

11 ऑक्टोबर - स्मृतिदिन


संत महात्म्यांचे हृद्गत । देवाचा शुभ सृष्टिसंकेत । विशद कराया सरळ भाषेत। सुखसंवाद आरंभिला ।। स्त्रिया, मुलेहि होतील आदर्शपूर्ण हा ग्रंथ घरी होता पठन। ग्राम होईल वैकुंठ भुवन। वाचता, वर्तता 'ग्रामगीता' ।। - ग्रामगीता


बालपण आणि शिक्षण:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उर्फ माणिक बंडोजी इंगळे यांचा जन्म 30 एप्रिल 1909 रोजी श्री बंडोजी उर्फ नामदेव गणेशपंत इंगळे व मंजुळा देवी यांच्या पोटी चंद्रमौळी झोपडीत एकुलत्या सुपुत्राचा जन्म प्रचंड वादळात झाला. 

यांचे नामकरण अकोटचे ब्रह्मनिष्ठ हरिबुवा आणि माधनचे अलौकिक संत श्री गुलाब महाराज यांनी नामकरण विधी संपन्न केला.

 त्यांचे "माणिकदेव" या जन्म नाव ऐवजी गुरुदत्त " तुकड्या " नावाच प्रचारात आले. घरची परिस्थिती साधारण असल्यामुळे अनेक कष्टप्राय वातावरणात वाढत गेले. 

चांदूर बाजारच्या विमलानंद भारती कडून त्यांनी छंदगायन हे शिकले. यावलीच्या हनवती बुवा कडून त्यांनी खंजिरी आणि साताळीकोथळीकर महाराजांकडून योगासन आणि एकतारी इत्यादी गोष्टी त्यांनी सहज अवगत केल्या.

लहानपणी त्यांना आईबरोबर घर सोडावे लागले आणि ते वरखेड क्षेत्री नातथपंथी विधेही संत श्री अडकोजी महाराजांच्या सहवासात राहू लागले. त्या ठिकाणी स्वतः गायन गात होते. 

ज्यावेळी 1921 मध्ये शतायुषी अकडोजी बाबा समाधीस्थ झाले तेव्हा माणिकदेवांना म्हणजेच तुकडोजी महाराजांना प्रसाद मिळाला. त्यांनी प्राथमिक शिक्षण पूर्ण केले आणि विनातिकीट पंढरपूरला दाखल झाले. 

पुंडलिकाच्या आदर्शांनी त्यांनी मात्र पित्र सेवेचा पाठ घेतला व यावलीस येऊन त्यांनी शिवणकाम करून आपल्या मातेचा सांभाळ केला. पण 1925 मध्ये त्यांनी विरक्त वृत्तीने शिवणयंत्र विकून दानधर्म करून रामटेकच्या अरण्यामध्ये निघून गेले.

 रामटेक वनामध्ये अतिशय प्रचंड ध्रुवाप्रमाणे तपस्या करत असताना त्यांना एक अज्ञात महायोगी भेटला आणि त्यांनी त्यास स्वतःच्या योग गुंफेत त्याला हटयोग शिकलेला.

X X

चिमूर भागातील श्रीमंत कृष्णराव भुते यांनी त्यांना बालवयाचाच नेरीला घेऊन गेले आणि तिथल्या भुतेश्वर मंदिरात अध्यात्म ग्रंथ वाचण्यास दिला. 

आदिवासी समाजात "देवबाबा" म्हणून त्यांनी कार्यज्योत पेटवली. नेरीच्या फकीरांना मंत्र तंत्र आधी साधनांचा फोलपणा पाटविला. भाबड्या लोकांनी त्यांना विष दिलं. पण त्यांनी मात्र जगाला "आनंदामृत" दिलं. याचवेळी चिमूरला 'माणिक प्रसादिक बालसमाज" जन्मास आला आणि 1919 साली महाराजांची पहिली हिंदी भजनावली प्रसिद्ध केली.

xxxx xxx

महाराजांचे समाज निरीक्षण:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज समाज परीक्षण करण्यासाठी व समाजाच निरीक्षण करण्यासाठी काशी, प्रयाग, हरिद्वार, पुष्कराज, पशुपतीनाथ (नेपाळ) इत्यादी अनेक दूरच्या ठिकाणांना तीर्थक्षेत्रांना भेटी देऊन ते सर्वत्र पाहून त्याचा आकलन करून त्याचा अभ्यास केला. तसेच लष्करी बाबा, वशिष्ठ महाराज, दादाजी धुनिवाले इत्यादी संतांच्या भेटी घेऊन त्यांच्या पावनभूमीत जाऊन सर्व समाजाच निरीक्षण केलं.

सर्व निरीक्षणातून तुकडोजी महाराजांनी देवभक्त, देशभक्त, सुशिक्षित, सुशिक्षित गृहस्थ, विभिन्न धर्मपंथीय इत्यादी सर्वांना गुंफण्यासाठी " श्रीगुरुदेव" ही भावना सर्वांपुढे ठेवली. 

कमी वयामध्ये साधा वेश धारण करून प्रचंड अध्यात्मतेच असणारे तुकडोजी महाराज लहान लहान बालकात खेळणं, पोहणे इत्यादी गोष्टी करत असत. पण स्वतः त्यांच्यामध्ये अलोक, अलौकिक, उर्ध्वदृष्टी, अद्भुत योग, घोडा, छकडा, सायकल, मोटार इत्यादी चालवण्यात व त्यांचे पप्राविण्य होते. 

ढोल, शंख, खंजिरी, एकतारी इत्यादी वाजण्यातील कौशल्य, त्यांच्यामध्ये असणारी अलौकिक अप्रतिम प्रतिभा, प्रभावी भजन रचना व अनेक दिग्गज पंडितांना ,संतांना थक्क करणारी बुध्दी या व्यसंगी व्यक्तिमत्वामुळे व त्यांच्या विलक्षण आकर्षणामुळे प्रचंड लोकसंग्रह त्यांच्या आजूबाजूला घडत होता व चैतन्याची अपुरा लाट समाजामध्ये त्यांच्याबद्दल पसरत होती.

X X

सत्याग्रहातील सहभाग:

 विदर्भातल्या गोंडवनातील 1930 च्या सत्याग्रही शिबिरामध्ये "झुठी गुलामशाही क्या डर बता रही है? अशी ओजस्वी राष्ट्रीय भजन गाजविल्यामुळे तेव्हा महाराजांना ब्रिटिशांकडून पकडण्याचा प्रयत्न झाला पण तो अयशस्वी झाला. 

1933 च्या चिमूरचा प्रथम चतुर्मासत महाराजांचे असामान्य व्यवस्थापन कौशल्य आणि क्रांतीप्रवन कार्य चुणूक दाखविणारे ठरले होता. 

1935 चा सालबर्डीचा महायज्ञ तर "न भूतो न भविष्यती" असा महाराजांनी करून दाखविला. त्यांने महाराजांची महानियता भारतापुढे आणली. 

चहा धूम्रपणा बरोबरच अनियमितपणाची आहुती देऊन खादी धारी महाराजांनी यावेळी जणू काया कल्पच करून टाकला होता. या वर्षी 1935 मध्ये जनसमूहाला नीट कार्यप्रवृत्त करण्यासाठी त्यांनी गुरुकुंज -मोझरीत "श्रीगुरुदेव धर्मसेवाश्रम" ची स्थापना केली.

आपल्या प्रेमी युवकांकडून " श्रीगुरुदेव आरती मंडळ" उभारून एक शिस्तबद्ध संघटना उभे केले. 

 महाराजांच्या काही द्वेषभक्तांनी त्यावेळी महात्मा गांधीकडे त्यांच्याबद्दल उलट सुलट चर्चा केली. त्यामुळे 1936 मध्ये महात्मा गांधींनी त्यांना सेवाग्रामला बोलून घेतले आणि त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने व देशभक्ती ने महात्मा गांधी एवढे प्रभावी झाले की महात्मा गांधींनी सेवाग्राम येथे राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना एक महिना ठेवून घेतले.

X X

राष्ट्रीय युवकांसाठी प्रशिक्षणे:

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी गुरुकुंज आणि नागठाणा येथील आश्रमात युवकांना प्रशिक्षण देण्यासाठी चातुर्मास घेतला. 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघ,भारत सेवा दल, कुस्तीगीरांची आखाडे इत्यादी ठिकाणी जाऊन "जाग उठो बालविरो अब तुम्हारी बारी है" ही ललकारी देऊन युवकांना प्रेरणा दिली. 

1941 ला युवकांचा 'स्वतंत्र राष्ट्रधर्म शिक्षण वर्ग' महाराजांनी घेतला. प्रतिदिवशी कित्येक हजार युवकांना व लोकांना आपल्या प्रभावी भाषणातून राष्ट्रीयतेची दीक्षा देणाऱ्या महाराजांनी 1942 च्या स्वातंत्र्यसंग्रामात अपूर्व रंग भरला. त्यामुळे तुकडोजी महाराजांना नागपूर, रायपूर तुरुंगात चार महिने डांबून ठेवले गेले. त्यानंतर सुद्धा चंद्रपूर, वर्धा जिल्ह्यात त्यांना ब्रिटिश सरकारने प्रवेश बंदी करण्यात आली. 

जेलमध्ये असताना सुद्धा महाराजांनी त्यांच्या अनुयायांना आरती, प्रार्थना, भजन हे शिकवले जेल बाहेर येतानाच महाराजांनी भारतव्यापी "विश्वशांती नामसप्ताह" सुरू करून एक नव संजीवनी सर्वांना दिली.

तुकडोजी महाराजांनी मानवधर्माचे शिकवण स्थायी करण्यासाठी 1943 मध्ये "श्रीगुरुदेव " मासिक सुरू केले. 

अकोला जिल्ह्यामध्ये अनेक शेकडो प्रचारक निर्माण केले. आदेशाचा शंख फुकुन आरती मंडळ शाखांचं "श्रीगुरुदेव सेवा मंडळ" नावाच उत्तम पूनरुजीवन केलं.

 गावोगावी प्रचार, प्रशिक्षण शिबिरे आयोजित केली. त्यात प्रार्थना, बलिदानबंदी, व्यसननिर्मूलन, विवाहसुधार, सहभोजन, कुस्तीस्पर्धा , भजन स्पर्धा इत्यादी उपक्रम अतिशय प्रकर्षाने राबवले व सर्व प्रचारकांची साखळी गुंफली.

 अखिल महाराष्ट्र शारीरिक शिक्षण परिषद 1945 मध्ये नागपूर येथे महाराजांनी खूप गाजवली. 1946 ला वरखेडच्या मंदिरापासून ते मंदिर प्रवेशाची लाट उठविली आणि दुष्काळात जनतेत मानवता जागवीत इंग्रजांना इशारा दिला.

"चेत रहा है भारत दुखसे, 

आग बुझाना मुश्किल है I 

उठा तिरंगा बढाके छाती, 

अब बहीलाना मुश्किल है II 

  ही प्रेरणा युवकांमध्ये जागविली.

xxx xxxxx

तुकडोजी महाराजांची स्वातंत्र्यानंतर कामगिरी:

 1947 ला लाभलेल्या स्वराज्याच सूराज्यात रूपांतर करण्याच्या संदेशा बरोबरच हे सर्व कार्यक्रम महाराजांनी प्रकर्षाने केली. 

सेवा सप्ताह, स्वच्छता सप्ताह ,स्वावलंबन सप्ताह, राष्ट्रीय एकात्मता सप्ताह, श्रमदानयज्ञ, जनजागृती, राष्ट्रधर्म, प्रचारयात्रा, इत्यादी नावाने अनेक तरुणांना दिशा सुचविली.

 महात्मा गांधींच्या निधनानंतर राष्ट्र नेत्यांचे लक्ष महाराजांकडे वळलं आणि 1948 च्या "सेवाग्राम" मधील देशी-विदेशी शांती दुतांच्या मेळाव्यात या राष्ट्रसंताला दिल्लीच्या नेत्यांनी पाचारण केलं आणि त्यांचं कार्य हे चौफेर विस्तारित केलं. 

 महाराष्ट्रीय व्यापारी संमेलन, अखिल भारतीय राष्ट्रभाषा प्रचार संमेलन, समाजसेवा संमेलन, विदर्भ साहित्य संमेलन, अखिल भारतीय नशाबंदी संमेलन, हरिजन संमेलन, भारत सेवक समाज संमेलन अशी शेकडो संमेलने महाराजांनी आपल्या प्रभावी मार्गदर्शनाने आणि प्रबोधनाने गाजविली.

पंजाब मधील वेदांत परिषद, नागपूरची महाराष्ट्र मुद्रण परिषद ,अमरावतीची महागाई परिषद, गोंदियाची तमाशा परिषद सुद्धा त्यांच्या व्यक्तिमत्व म्हणून दिपून गेली.

आदिवासी युवक प्रशिक्षण, ग्रामसहाय्यक प्रशिक्षण, कुष्ठरोग निवारण, दाईवर्ग, अखिल भारतीय आयुर्वेद महासंमेलन इत्यादी असंख्य योजनांना त्यांनी आश्रय दिला.

शिख संमेलन, वीरशैव संमेलन , पारशयांचा महोत्सव, राज्यपाल डॉ. चेरियन यांचा ख्रिस्ती उत्सव, भंडाऱ्याच्या अवलिया बाबांचा मुस्लिम उत्सव अशा सर्वांत प्रेमानं संमेलित झाले आणि खूप छान पद्धतीने त्यांनी सामाजिक कार्यामध्ये काम केले.

देशाच्या विविध भाग पंजाब पासून ते म्हैसूर पर्यंत तुकडोजी महाराजांच्या खंजिरीने जागविला. गोमंतक आणि नेपाळही त्यांनी मुग्ध केला. 

अनेक संस्थांमध्ये केलेली त्यांची कामगिरी पाहून नवनिर्माणाची अपूर्व लाट उठविली ती पाहून केंद्रीय मंत्री ही थक्क झाले होते.

X X

देशात व परदेशात केलेली अमभुतपूर्व कामगिरी:

पंढरपुरात "संतसंमेलन" घडविण्याच अवघड कार्य राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी केेले.अखिल भारतीय स्तरावर "भारत साधूसमाज" निर्मिती कार्य करून दाखवील. आणि ते तीन वर्ष सर्व महामंडलेश्वरांचे अध्यक्ष राहिले.

 गुजरातने आणि मुंबईत "सर्वधर्म परिषद" गाजविणाऱ्या महाराजांना विश्वधर्म परिषदेसाठी 1952 मध्ये अमेरिकेचे निमंत्रण आलं. 

1955 मध्ये जपानचं निमंत्रण स्वीकारून त्यांनी तेथे विश्वधर्म आणि विश्वशांती परिषदांना स्तिमित केलं. त्यावेळेस पासून संत तुकडोजी महाराज 18 देशांच्या समितीचे सल्लागार म्हणूनही काम पाहत होते आणि त्यांना अनेक देशाची निमंत्रण येत होती.

X X

संकटावर मात करण्यासाठी महाराजांनी दिलेली प्रेरणा:

दिल्लीच्या 1948 च्या निर्वासित शिबिराला त्यांनी खूप मोठा दिलासा दिला. तसेच पुण्याचा जलप्रलय, विदर्भातील पूर- कहर, नागपूरचा हिंदू मुस्लिम दंगा, कोयना भूकंप इत्यादी संकटात ते धावून गेले. 

उत्तर सीमेवर 1962 मध्ये चिनी आक्रमण हटविण्यासाठी संरक्षण निधीला आणि सैनिकी शाळेला प्रोत्साहन आणि सेवाग्रामच्या शांतीसभेला कलाटणी देऊन आसाम मध्ये आणि सर्वत्र वीरश्री संचार यांनी केला. 

1965 च्या पाकिस्तानी आक्रमणात लाहोर सीमा दौरा करून लष्कराला त्यांनी जोश व प्रेरणा दिली. 

ऊणे दिसे ते पूर्ण करी I 

जगाचा तोल बोधे सावरी I

 या सूत्रानुसार शासनाच्या समाज शिक्षण परिवार नियोजन नशाबंदी योजनेमध्ये प्राण ओतला.

विनोबाजींच्या भूदान चळवळीच्या निर्णयात त्यांनी स्वतःला एवढे झोकून काम केले की अकरा दिवसात अकरा हजार एकर भूमी भूतदानात मिळविली.

 साने गुरुजींच्या मंदिर प्रवेशासाठी त्यांनी प्रयत्न करुन दहा दहा गावांची मंदिरे हरिजनांसाठी खुली केली गेली. हे त्यांचे अभुतपूर्व कार्य करताना 103 डिग्री ज्वरातही आरोग्यावर परिणाम झालेला असताना सुद्धा एक हजार पाचशे मैलांचा प्रवास भजनी दौऱ्यातून त्यांनी पूर्ण केला. 

गांधी स्मृती दिनानिमित्त आदर्श ग्राम निर्माण 2500 व्या बुद्ध जयंती निमित्त एक कोटी तासांचा समदानयज्ञ आयोजित करून शंभर गावांमध्ये बंधारे, सौचालये, श्रमदानाने रस्ते ,शोष खड्डे आदी निर्माण करून भगवान बुद्धाला सक्रिय श्रद्धांजली वाहिली.

तुकडोजी महाराजांनी आपला जन्मदिन करू इच्छिणाऱ्या लोकांना "ग्रामजयंती" साठी प्रवृत्त करून राष्ट्रपती समोर 500 चरख्यांचा या सूत्रयज्ञ करून दाखविला. 

सततच्या कार्यामध्ये व्यस्त असताना सुद्धा अनेक प्रवासाने अनेक ठिकाणी प्रवास करून सुद्धा राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी 105 च्या वर हिंदी, मराठी, गद्य -पद्य ग्रंथ लिहून प्रसिद्ध केले व अजूनही अप्रकाशित असलेले साहित्य त्यांचे खूप शिल्लक आहे.

X X

तुकडोजी महाराजांचे महानिर्वाण:

अशा सहस्त्रपैलू व्यक्तिमत्त्वाच्या राष्ट्रसंतांनी मातीतून सेना निर्मून अल्पावधीत जे अनमोल आणि अमोल कार्य सर्वांगीण दृष्टीने उभं केलं त्याला तोड नाही. 

1968 साली त्यांना दुर्धर आजाराने ग्रासले. कमालीच्या वेदना चालू असतानाही तुकडोजी महाराजांनी निरंतर राष्ट्रधर्म जनजागृती दौरा केला. 

उज्जैन ला कार्यकर्ता संमेलन आणि गुरुकुंजात 16 राज्यांच्या प्रतिनिधींच शिबिर "गांधी गीतांजली" पूर्ण केल.

 आषाढीला पंढरीच्या पांडुरंगाच्या दरबारी त्यांनी शेवटचं भजन करून समारोप केला.

एवढ्या एवढ्या दुर्धर आजारांनी ग्रासलेले असताना सुद्धा रुग्णशयवरूनच राष्ट्रासाठी व्यापक लेख त्यांनी त्यावेळेस लिहिला भक्तांसाठी अर्त संदेश देऊन गुरुकुंज गाठलं. 

मुंबई आणि गुरुकुंजात विविध क्षेत्रातील हजारो व्यक्ती आणि हजारो भक्त महाराजांच्या दर्शनासाठी महिला पुरुष यांची रांग लागली होती. त्यांच्यासाठी कोटी कोटी लोकांच्या कंठातून त्यांच्यासाठी प्रार्थना निनादू लागल्या.

 कॅन्सरच्या वेदना किती भयानक असतात म्हणून प्रतिपादन करून नागपूर सारख्या मध्यवर्ती ठिकाणी हॉस्पिटल निर्माण करण्यास कार्यकर्त्यांना प्रवृत्त त्यांनी केले आणि अखेरची पत्रपरिषद आणि सर्व धर्मीय प्रार्थना घेऊन राष्ट्रसंत तुकडोजी महाराज आश्विन वद्य पंचमी शके 1890 दुपारी 4.58 मि. दि. 11 ऑक्टोबर 1968 रोजी त्यांनी आपला देह ठेवला.त्यांचे महानिर्वाण झाले.

राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी ग्रामगीता माझे ह्रदय त्यात बसले सद्गुरुराय ही जाणीव देणारा ग्रामगीतेचा अमर ठेवा सर्व समाजासाठी ठेवून दिलेला आहे.

ईश्वरभक्तीबरोबरच समाजसुधारणेचे विषयही कीर्तनात हाताळल्याने त्यांना 'राष्ट्रसंत' असे संबोधले जाते. 

xxx xxx

तुकडोजी महाराजांचा प्रसिद्ध "ग्रामगीता" : 

तुकडोजी महाराजांनी एकूण आठ अध्यायामध्ये 41 वेगवेगळ्या भागात विविध विषयाबद्दल ग्रामगीतेत वर्णन केले आहे.

पहिला अध्याय: सद्धर्ममंथन पंचक-

1. देव-दर्शन,2. धर्माध्ययन,3. आश्रम-धर्म,4. संसार- परमार्थ,5. वर्ण-व्यवस्था

दुसरा अध्याय: लोकवशीकरण पंचक-

6. संसर्ग-प्रभाव,7. आचार-प्राबल्य,8. प्रचार - महिमा 9. सेवा-सामर्थ्य,10. संघटन शक्ती

तिसरा अध्याय: ग्रामनिर्माण पंचक-

11. ग्रामरक्षण,12. ग्रामशुद्धी,13. ग्रामनिर्माणकला,14. ग्राम आरोग्य ,15. गोवंशसुधार

चौथा अध्याय: दृष्टिपरिवर्तन पंचक-

16. वेष-वैभव,17. गरिबी-श्रीमंती,18. श्रम- संपत्ती,19. जीवन - शिक्षण,20. महिलोन्नती

X X

पाचवा अध्याय: संस्कारशोधन पंचक-

21. वैवाहिक जीवन,22. अंत्यसंस्कार ,23. सणोत्सव,24. यात्रा- मेळे,25. देव-देवळे

सहावा अध्याय: प्रेमधर्मस्थापन पंचक-

26. मूर्ति-उपासना,27. सामुदायिक प्रार्थना,28. प्रार्थना व विश्वधर्म,29. दलित-सेवा,30. भजन प्रभाव

सातवा अध्याय: देवत्व - साधन पंचक-

31. संत चमत्कार,32. संत-स्वरूप,33. अवतारकार्य,34. प्रारब्धवाद,35. प्रयत्न प्रभाव

आठवा अध्याय: आदर्श जीवन पंचक-

36. जीवन-कला,37. आत्मानुभव,38. ग्राम-कुटुंब,39. भू-वैकुंठ,40. ग्रंथाध्ययन,41. ग्रंथ-महिमा

X X

तुकडोजी महाराजांची भजने:

1. भजन 

मनी नाही भाव, म्हणे देवा ! मला पाव ।
देव अशानं, भेटायचा नाही हो । 
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ।।धृ।।
मातीचा देव त्याला पाण्याचं भेव ।
सोन्या-चांदीचा देव, त्याला चोराचं भेव ।
लाकडाचा देव, त्याला अग्नीचं भेव
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ।।१।। 
देवाचं देवत्व नाही दगडातं ।
देवाचं देवत्व नाही लाकडातं । 
सोन्या चांदीत नाही देवाची मात ।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ॥२॥
'भाव तिथं देव' ही संताची वाणी ? 
आचारावाचून पाहिला का कोणी ?.
शब्दांच्या बोलानं शांति नाही मनी । 
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ||३||
देवाचं देवत्व आहे ठायी - ठायी ।
'मी-तू' गेल्याविण अनुभव नाही । 
तुकड्यादास म्हणे ऐका ही ग्वाही ।
देव बाजारचा भाजीपाला नाही हो ! ॥४॥

X X

2. भजन

या झोपडीत माझ्या......


राजास जी महाली सौख्ये कधी मिळाली । 
ती सर्व प्राप्त झाली, या झोपडीत माझ्या ||धृ०॥ 
महाली मऊ बिछाने, कंदील शामदाने । 
आम्हा जमीन माने, या झोपडीत माझ्या ॥१॥ 
भुमीवरी पडावे, ताज्यांकडे पहावे । 
प्रभुनाम नित्य गावे, या झोपडीत माझ्या ॥२॥ 
स्वामीत्व तेथ त्याचे, तैसेचि येथ माझे ।
माझा हुकूम गाजे, या झोपडीत माझ्या ॥३॥ 
महालापुढे शिपायी, शस्त्री सुसज्ज राही ।
दरकार तीहि नाही, या झोपडीत माझ्या ||४|| 
जाता तया महाला, 'मत जाव' शब्द आला । 
भीती न यावयाला, या झोपडीत माझ्या ||५|| 
महालात चोर गेले, चोरूनि द्रव्य नेले ।
ऐसे कधी न झाले, या झोपडीत माझ्या ||६|| 
पहारे आणि तिजोऱ्या, त्यातूनि होती चोऱ्या ।
दारास नाहि दोऱ्या, या झोपडीत माझ्या ॥७॥ 
महाली सुखे कुणा ही ? चिंता सदैव राही । 
झोपेत रात्र जाई, या झोपडीत माझ्या ||८|| 
येता तरी सुखे या, जाता तरी सुखे जा | 
कोणावरी न बोझा, या झोपडीत माझ्या ||९|| 
चित्तात अन्य रामा, शब्दी उदंड प्रेमा ।
येती कधी न कामा, या झोपडीत माझ्या ॥ १०॥ 
पाहोनि सौख्य माझे, देवेंद्र तोहि लाजे ।
शांती सदा विराजे, या झोपडीत माझ्या ।। ११ ।।
वाडे, महाल, राने, केले अनंत ज्याने । 
तो राहतो सुखाने, या झोपडीत माझ्या ।।१२।। 
'तुकड्या' मती स्फुरावी, पायी तुझ्या रमावी । 
मूर्ती तुझी रहावी, या झोपडीत माझ्या ।।१३।।

X X

॥ ग्रामगीता पसायदान ।।

ओम् नमोजी विश्वचालका । जगद्वंदया ब्रम्हांडनायका । एकचि असोनि अनेका। भासशी विश्वरुपी ||१|| अवघाचि संसार व्हावा सुखी मंगलता निघो सर्वामुखी खळ दुर्जनांचीही दृष्टि निकी व्हावी सर्वथा ||२|| मित्रता नांदावी सर्व जनी । उणीव न दिसावी कोठे कोणी जी जी इच्छा करिती प्राणी । व्हावी पूर्ण ती न्याये ||३|| नको कोठेही द्वेष, वैर । न उरो कोठे हाहाःकार । दंभ, मत्सर, अत्याचार । अनाचार न राहो ||४|| लया जावो जगाचा भेद परस्परपोषक होवोत वाद नांदो आनंदी आनंद | सगळीकडे सर्वदा ||५|| सर्वांमाजि एकचि भाव आकुंचित न व्हावा मानव । सामुदायिक वृत्तीने करावे सर्व । विश्वचि सुखी ||६|| ज्या ज्या मार्गे ऐसे घडे । तोचि धर्म, तेचि ज्ञान रोकडे । तुकड्या म्हणे समाधान जोडे । सकल जनांसि ||७||

x x

 



वं. राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांची महासमाधी श्री क्षेत्र गुरुकुंज आश्रम ता.ति जि. अमरावती( महाराष्ट्र राज्य)











View, comments and Share...........

Post a Comment

5 Comments